कुऱ्हा काकोडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वडोदा येथील शेती शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यामध्ये १४ शेळ्या ठार झाल्या आहेत. दरम्यान, घटनास्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शालिग्राम निनाजी बोदडे (रा. वडोदा) यांचे वडोदा शिवारात शेत असून, गट क्रमांक २६८ मधील शेतामध्ये शेळ्यांचा कळप लावलेला होता आणि तार जाळीचे कुंपण देखील होते. शेतकरी शालिग्राम बोदडे नेहमीप्रमाणे जेवण करण्यासाठी घरी गेले असता लांडग्यांच्या टोळीने जाळीच्या खालून शेळ्यांच्या कळपात घुसून हल्ला केला. यामध्ये त्यांच्या १४ शेळ्या ठार झाल्या तर काही जखमी झाल्या. त्यात अर्ध्या खाल्लेल्या अवस्थेत शेतकऱ्याला आढळून आल्या. त्यांनी गावातील काही नागरिकांना व शिवसेना उप तालुकाप्रमुख नवनीत पाटील यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली असता नवनीत पाटील यांनी तत्काळ वन विभागाच्या वनपाल श्रीमती बी. आर. मराठे, वनपाल डी. जी. पचपांडे यांना घटनेची माहिती दिली. रात्रीच तत्काळ वन विभागाची टीम वढोदा येथे जाऊन त्यांनी पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळी पाऊलखुणा व खाण्याच्या पद्धतीवरून हा हल्ला लांडग्यानेच केल्याचे समजते.
कुऱ्हा पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. अभय डुगरीकर यांनी घटनास्थळी जाऊन मृत झालेल्या शेळ्यांचे शवविच्छेदन केले तर जखमी अवस्थेत असलेल्यांवर उपचार केले.
आमदार पाटील यांची भेट
शिवसेना उपतालुका प्रमुख नवनीत पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना रात्रीच या घटनेची माहिती दिली. त्यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लवकरात लवकर शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना त्यांनी वन विभागाला केल्या. यावेळी नवनीत पाटील, पंकज पांडव, सतीश नागरे, दीपक वाघ, दिलीप पाटील, विश्वास पाटील, अण्णा पवार, इम्रान खान, उद्वव कोथळकर, संदीप बोदडे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.