बोदवड (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भारतीय अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शिक्षणाचे महत्त्व या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा दि. २१ रोजी संपन्न झाली. सदर कार्यशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विद्यार्थी विकास विभाग आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथील विद्यार्थी विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रसंगी शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा येथील प्राचार्य डॉ. लता मोरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील डॉ. मनीषा जगताप, मुळजी जेठा महाविद्यालयात जळगाव येथून प्राध्यापक भूपेंद्र केसुर, एनगाव ता. बोदवड येथील ढाके विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम गड्डम सर तर सारंग कृपा फाउंडेशन, दिपनगर येथील प्राचार्य दीपिका पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी, उपप्राचार्य विनोद चौधरी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील, डॉ. मनोज निकाळजे, डॉ. रूपाली तायडे मंचावर उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत सदर कार्यशाळेचे मार्गदर्शक कसे निवडले हे स्पष्ट केले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदा येथील प्राचार्य लता मोरे यांनी शिक्षणाचे महत्त्व व गरज ह्या विषयावर पीपीटी द्वारे सादरीकरण केले. शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये कसा विकास घडतो. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, भावनिक आणि कार्यशक्तीचा विकास हा डोक्याने, मनाने तसेच हाताच्या कुशल कार्याने एकत्रित रित्या घडविता येतो. ध्येयप्राप्तीसाठी आत्मपरिचय आणि आत्म नियंत्रण महत्त्वाचे असून स्वतःचे दीपस्तंभ होणे गरजेचे आहे. हे सांगत असताना त्यांनी ‘पंखो से कुछ नही होता, होसलो से उडान होती है’ असे ही स्पष्ट केले.
द्वितीय सत्रामध्ये मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील प्राध्यापक भूपेंद्र केसुर यांनी उच्च शिक्षणातील आव्हाने आणि संधी या विषयावर प्रकाश टाकत नवीन शैक्षणिक धोरण २०२०विशद केले.भविष्यातील उच्च शिक्षणाबाबत सांगत असताना जागतिक दर्जाची आभासी विद्यापीठे व्यावसायिक आणि व्यावसायिक शिक्षणावर भर तसेच भौगोलिक सीमांच्या पलीकडे दर्जेदार शिक्षण अशा अनेक विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यशाळेच्या तृतीय सत्रामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील डॉ. मनीषा जगताप यांनी उच्च शिक्षणाची सद्यस्थिती व भविष्य या विषयावरती सखोल असे मार्गदर्शन करत उच्च शिक्षण जगण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी कसे महत्त्वाचे आहे तसेच शिक्षणाची बदलती भूमिका याबाबतही मार्गदर्शन केले आपण केलेले प्रयत्न हे कधीही वाया जात नाहीत म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कायमच प्रयत्न करून ध्येयप्राप्ती करावी असेही आव्हान आपल्या व्याख्यानातून केले.
चतुर्थ सत्रामध्ये जी. डी. ढाके विद्यालय एनगावचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम कदम सर यांनी शिक्षण: व्यवस्था, अवस्था आणि अपेक्षा या विषयावर मार्गदर्शन करत शेरोशायरी, विनोद, कविता तसेच जंगलातील प्राणी आणि पक्षांची शाळा अतिशय बहारदार पद्धतीने सादर करत विद्यार्थ्यांची मने जिंकली. आपल्या मार्गदर्शनामध्ये पालकांची त्यांच्या पाल्यांकडून अवास्तव अशी अपेक्षा असते हे सांगत एका पालकाचे उदाहरण दिले. सदर पालक आपल्या पाल्याला बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याबद्दल नाराज होते. नाराजीच कारण विचारत असताना त्यांनी सांगितलं की, त्याला खूपच कमी मार्क मिळाले. किती तर म्हटले 94% …अशा प्रकारची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले त्याचबरोबर अजूनही आपल्या देशातील सध्याच्या शिक्षण पद्धतीत इंग्रजांचाच प्रभाव आहे हे त्यांनी स्पष्ट केले.
चतुर्थ सत्र झाल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत खुली चर्चा आयोजित करण्यात आली निकिता पालवे तृतीय वर्ष विज्ञान आणि मोहिनी विनोद पाटील प्रथम वर्ष विज्ञान यांनी कार्यशाळे संदर्भातील मनोगते व्यक्त केली.कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी प्रमुख अतिथी श्री पुरुषोत्तम गड्डम सर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज निकाळजे, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रूपाली तायडे उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना कार्यशाळा संपल्यानंतर पूर्णवेळ उपस्थितीबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र जोशी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज निकाळजे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. ईश्वर मसलेकर, प्रा. नितेश सावदेकर, प्रा. वैशाली संसारे, प्राध्यापक प्रभाकर महाले, उपस्थित विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
















