मुंबई (वृत्तसंस्था) जगभरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. या कोरोनापासून कोणाचीही सुटका नाही असच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी स्वत: क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांनी हा घेतला निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे.
“काही दिवसांपूर्वी मी अशा व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो, ज्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे,” असे टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी सांगितले आहे. टेड्रॉस यांनी ट्विटरवरुन यांनी ही माहिती दिली. डॉ. टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “मी अशा व्यक्तीच्या संपर्कात आहे, ज्याची कोविड-19 च्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी पूर्णत: ठीक असून कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार मी येत्या काही दिवसांसाठी स्वत:च क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. घरातूनच मी काम करणार आहे.”
त्यांनी पुढे लिहिलं आहे की, “आपण सर्व आरोग्य मार्गदर्शन सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. याद्वारे आपण कोविड 19 च्या प्रसाराची साखळी तोडून आरोग्य यंत्रणांचं रक्षण करु शकतो. WHO चे माझे सर्व सहकारी आणि मी जीव वाचवण्यासाठी आणि लोकांचं रक्षण करण्यासाठी एकजुटीने काम करत राहणार आहोत.”
नुकतंच डब्ल्यूएचओने सर्व देशांच्या सरकारांना पाच मुख्य पावले उचलण्याचे आवाहन केले होते. यानुसार ज्या देशांनी कोविड-19 चा प्रसार यशस्वीरित्या नियंत्रित केला आहे, त्यांना प्रसारचा स्तर कमी ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न करणे, सतर्क राहणे आणि त्वरित काम करण्यासाठी तयार राहणे या गोष्टी कराव्यात असे सांगण्यात आले आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या आणि आयसीयूचा वापरण्याचा दर वाढत आहे, त्यांना लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.















