यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील एका वाहन चालकाचा गळा चिरून व दगडाचे ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. भिमराव शंकर सोनवणे (वय-६० वर्ष, रा. किनगाव बुद्रुक ता. यावल) असे वृद्ध मयत वाहन चालकाचे नाव आहे.
यासंदर्भात मिळालेली माहीती अशी की, भिमराव सोनवणे हे किनगाव बुद्रुक येथे मुलगा व सुनेसह वास्तव्यास आहेत. खासगी वाहनावर ते चालक म्हणून काम करीत होते. कामानिमित्ताने घराबाहेर पडलेले भिमराव सोनवणे हे गुरुवारी रात्री घरी परत आले नाहीत. शुक्रवारी सकाळी गावातील शेतमजूर हे शेतात जात असताना गावापासून काही अंतरावर असलेल्या किनगाव चुंचाळे रस्त्यावरील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली त्यांना बेपत्ता असलेल्या भिमराव सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने गळा चिरून नंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केला. तसेच भिमराव सोनवणे यांच्यावर सुरुवातीला मारेकऱ्यांनी गळ्यावर वार केले, त्यानंतर त्यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासावरून समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे, यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले होते. यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात मयत भिमराव सोनवणे यांचा मुलगा विनोद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.