यवतमाळ (वृत्तसंस्था) सावकारीतील पैशाच्या वादात गोळी झाडून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. १०) रात्री साडेआठ वाजतादरम्यान पांढरकवडा मार्गावरील रॉयल पॅलेससमोर असलेल्या आर. एस. कार केअरमध्ये घडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ सात मारेकऱ्यांना गजाआड केले. अक्षय सतीश कैथवास (२७) रा. इंदिरानगर असे मताचे नाव आहे. दरम्यान, या घटनेचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मृत अक्षय यवतमाळ येथे गृहरक्षक दलात (होमगार्ड) म्हणून कार्यरत होता. त्याची आई संगीता सतीश कैथवास यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी हसीना खान ऊर्फ लक्ष्मीबाई लिल्हारे (४५), विजय लिल्हारे (४७), गोलू लिल्हारे (१९), खुशाल लिल्हारे (२१), सोपान लिल्हारे (२५), शरीफ खान (४०), अजीज दूंगे (३१) या सातजणांविरुद्ध पोलिसांनी कलम ३०२, १२० ब ३४ शस्त्र अधिनियम ३/२५ आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील कलम ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षयचा खून केल्यानंतर अजय दुंगे व सोपान लिल्हारे हे दोघे चारचाकी वाहनाने कारंजा येथे पसार झाले होते. पोलिसांनी रात्रभर शोध घेत या आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरलेले वाहन, देशी पिस्टल व इतर शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी मृताची आई संगीता कैथवास यांनी केलेल्या तक्रारी म्हटले आहे की, त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या हसीना खान उर्फ लक्ष्मीबाई लिल्हारे यांच्याकडून त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते. ती रक्कम आणि व्याज परतही केले होते. मात्र त्यानंतरही लक्ष्मीबाई लिल्हारे यांनी काही दिवसांपूर्वी संगीता यांच्या घरी येऊन अतिरिक्त पैशाची मागणी केली होती. त्यावेळी ते पैसे देण्यास संगीता आणि त्यांचा मुलगा अक्षय याने नकार दिला. त्यावरुन लक्ष्मीबाईने जीवे मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, घटनेच्या दिवशी अक्षय कैथवास हा पांढरकवडा मार्गावरील कार केअर सेंटरमध्ये गाडी दुरुस्तीसाठी गेला याचवेळी आरोपींनी त्या ठिकाणी जाऊन अक्षयसोबत वाद घातळा. या वादात पळत असलेल्या अक्षयला खुशाल लिल्हारे याने धावत जाऊन पकडले आणि अज्जू ढुंगे याने बंदुकीने अक्षयच्या डोक्यात एक आणि छातीत एक अशा दोन गोळ्या झाडल्या, त्यात अक्षयचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृताच्या नातेवाइकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. आरोपीच्या घरापुढे उभी असलेली कार व दुचाकी पेटवून दिली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना अवधूतवाडी पोलिसांनी रात्रीतूनच अटक केली. सावकारीच्या पैशातून वाद झाला. त्यातूनच ही घटना घडली आहे.