नांदेड (वृत्तसंस्था) क्षुल्लक कारणावरुन शहरातील सांगवी भागात अंबानगरमध्ये एका तरुण मजूराचा डोक्यात लाकडा टाकून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
अंबानगर येथील संदीप रघुनाथ चौदंते हा कचरा गोळा करण्याचे काम करतो. शुक्रवारी दुपारी प्रमोद जोंधळे हा त्याच्याजवळ आला. कचरा गोळा करण्याचे काम करुन तू समाजात आपली इज्जत घालवत आहेस, त्यामुळे हे काम सोडून दे म्हणून वाद घातला. यावेळी चौदंते याने कचरा करण्याचे काम हे पोटापाण्यासाठी करीत असून ते सोडणार नसल्याचे सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. प्रमोद जोंधळे याने संदीप चौदंते याला लाकडाने बेदम मारहाण करायला सुरुवात केली.
संशयित आरोपी प्रमोदने जागेवर पडलेल्या लाकडी ओंडक्याने संदीपवर हल्ला केला. त्यात संदीप गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळला. या घटनेनंतर अनेक जणांनी धाव घेतली आणि गंभीर जखमी संदीपला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, घटनेनंतर आरोपी प्रमोद जोंधळे फरार झाला असून विमानतळ पोलिस त्याच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.