चाळीसगाव (प्रतिनिधी) मी तुमचे पैसे काढून देतो, असे म्हणत एटीएम कार्डचा पिन घेऊन एटीएम कार्डच्या ऐवजी दुसरे एटीएम कार्ड देऊन एका ४४ वर्षीय व्यक्तीची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सतीश दगडू चव्हाण (वय ४४ रा. मु. पिंप्री पोस्ट गणेशपुर ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ मे २०२२ रोजी सतीश चव्हाण हे एसबीआय बँक एटीएम, भडगाव रोड, चाळीसगाव येथे पैसे काढण्याकरिता गेले. यावेळी एटीएम मशीन मधून पैसे निघत नसल्यामुळे सतीश चव्हाण यांच्या पाठीमागे उभा असलेला वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे अंगात टी शर्ट जीन्स पॅन्ट घातलेला अनोळखी इसम याने मी तुमचे पैसे काढून देतो, असे म्हणून सतीश चव्हाण यांचे एटीएम कार्ड घेत त्यांच्याकडून पिन नंबर घेऊन हात चालाखीने एटीएम कार्डच्या ऐवजी दुसरे एटीएम कार्ड दिले. तसेच एटीएम कार्डचा वापर करून सतीश चव्हाण यांच्या बँक खात्यातून ३६ हजार रुपये काढून घेवून फसवणूक केली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोणा दीपक प्रभाकर पाटील हे करीत आहेत.