जळगाव (प्रतिनिधी) नापतोल ऑनलाईन शॉपींग कंपनीकडून तुम्हाला मारुती स्विफ्ट डीझायर गाडी ‘लकी ड्रॉ’मध्ये लागल्याची बतावणी करून विविध चार्जेसच्या नावाखाली ४ लाख ८० हजार २४२ रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)
या प्रकरणी गिता राजेश तिलकपुरे (रा. नवीपेठ जळगाव) यांनी याप्रकरणी दाखल गुन्ह्यात नितीनकुमार सिंग असे नाव सांगणा-या अनोळखी व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नापतोल ऑनलाईन शॉपींग या कंपनीकडून मारुती स्विफ्ट डिझायर गाडी लकी ड्रॉ मधे लागल्याचे कुपन सौ. तिलकपुरे यांना पोस्टाने त्यांच्या राहत्या पत्त्यावर आले होते. या कुपनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यात नमुद केले होते. त्या क्रमांकावर सौ. तिलकपुरे यांनी संपर्क साधला.
समोरील बोलणा-याने आपले नाव नितीनकुमार सिंग असे त्यांना सांगितले.
आपण नापतोल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नितीनकुमार सिंगनामक व्यक्तीने सौ. तिलकपुरे यांना त्यांच्या व्हाटसअॅप क्रमांकावर कंपनीचे बनावट नाव, लोगो, स्टॅंप असलेले मिनीस्ट्री ऑफ फायनान्सचे बनावट पत्र असे एक ना अनेक कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन केला. आपल्याला चारचाकी गाडी मिळणार या आमिषाला भुलून सौ. तिलकपुरे यांनी विविध चार्जेसच्या नावाखाली ‘फोन पे’ च्या माध्यमातून नितीनकुमार सिंग नामक व्यक्तीला वेळोवेळी एकुण ४ लाख ८० हजार २४२ रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सौ. तिलकपुरे यांनी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करत आहेत.
















