मुंबई (वृत्तसंस्था) तुम्ही खुशाल सीडी लावा, तुम्हाला कोणी रोखले आहे?, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना डिवचले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतल्या प्रवेशावेळी खडसे यांनी तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन, असे म्हटले होते.
भाजपामधून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. पुण्याजवळील भोसरी येथील भूखंडाच्या संबंधित व्यवहारांबाबत खडसे यांना ही नोटीस पाठवण्यात आली असून त्यासाठी त्यांना ३० डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाच्या वेळी खडसे यांनी जर तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन, असे म्हणाले होते. त्या वक्तव्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज म्हटले की, ईडी ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो. भाजपा ईडी मागे लावते असे त्यांना वाटतेय का? ईडीची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि राहिला प्रश्न सीडी लावण्याचा… तुम्ही खुशाल सीडी लावा. तुम्हाला कोणी रोखले आहे?”, असे उत्तर त्यांनी दिले आहे.
















