अकोला (प्रतिनिधी) भरधाव वेगात जात असलेल्या कारने एका दुचाकीस्वार युवतीस उडविल्याने ती जागीच ठार झाली. हा अपघात एवढा भयावह होतो की, युवतीचे मुंडके धडावेगळे होऊन तीस फुटावर फेकले गेले. शुक्रवारी सकाळी 9 वाजता झालेल्या या अपघाताने शहर हादरले आहे. अकोल्यातील बेशिस्त वाहतुकीचे आणखी किती बळी जाणार असा प्रश्न अकोल्यातील जनता जिल्हाप्रशासनास करीत आहे.
सिंधी कॅम्प येथील रहिवासी नेहा सच्चानंद सचवानी ही २२ वर्षीय युवती शुक्रवारी पहाटे उड्डाणपूलावरून सिंधी कॅम्पकडे जात असताना अचानक दोन फोरव्हीलर तिच्या दिशेने आल्यात. काही समजण्याच्या आधीच एक भरधाव कारने तिला हवेत उडविले. या धडकेत युवतीचे धड जागेवर आणि मुंडके वेगळे फेकले गेले. नेहा सकाळी तिच्या चुलत भावांना मोटारसायकीने माऊंट कारमेल हायस्कूलमध्ये सोडायला आली होती. त्याआधी तिने वडिलांना भाजी बाजारात सोडले. ती मोटारसायकलीने जात उड्डाणपुलामार्गे जेलकडे निघत असताना, अशोक वाटीकेजवळ हा अपघात झाला.
या अपघातात महिलेचे शिर शरीरापासून वेगळे हाेत तब्बल ३० फुट दुर गेल्याने प्रत्यक्षदर्शिंचा थरकाप उडाला़. एवढेच नव्हे तर, अपघाताचे प्रत्यक्षदर्शी यांच्या किंचाळ्या निघाल्या तर एकाची दातखळीही बसल्याचेही कळते.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.
सिटी कोतवाली, खदान पोलीस सिव्हिल लाईन आणि वाहतूक शाखेचे ठाणेदार त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले होते. पुढील तपास सिटी कोतवाली व सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत. नेहाने नागपूर येथे एमटेकचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. चार दिवसानंतर ती नागपूरला जाणार होती.
दरम्यान, कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. गत महिन्याभराआधीच शहरातील दुसऱ्या उड्डाणपूलावर असाच अपघात घडला होता. दुचाकीवरून जात असताना लक्झरीच्या मागिल खिडकीचे झाकण उघडून अंगावर फेकले गेले होते. त्यात तलाठी थोरात यांची मान कापली गेली होती. त्यानंतर एक महिना देखिल होत नाही तोच पुन्हा बेशिस्त वाहतूकीने दुसरा बळी घेतला आहे.
















