
जळगाव (प्रतिनिधी) -: दोन दिवसांपूर्वी गावी आलेल्या प्रेम गोपाल धनगर (वय २१, रा.. बोरनार, ता. जळगाव) या तरुणाच्या पाठीत धारदार चॉपर खुपसून त्याचा निघुण खून केला. ही घटना बुधवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बोरणार येथे लग्नसमारंभ सुरु असलेल्या ठिकाणी घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजून गेली असून याप्रकरणी पोलिसांनी पंधरा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तालुक्यातील बोरणार येथे प्रेम धनगर हा आई-वडीलांसह वास्तव्यास होता. काही महिन्यांपासून तो कामानिमित्त अमळनेर येथे मामांकडे गेला होता. दोन दिवसांपुर्वीच तो गावात राहणाऱ्या आई-वडीलांच्या भेटी करीता आला होता, दरम्यान, बुधवारी गावात लग्नसमारंभ असल्याने प्रेम सायंकाळी त्याठिकाणी गेला होता. दम्यान, तेथील काही जणांनी त्याच्यासोबत वाद घातला. या वादानंतर पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने प्रेमला मारहाण केली आणि त्यानंतर त्यातीलच एकाने धारदार चॉपर प्रेमच्या पाठीत खूपसला, गंभीर जखमी झालेला प्रेम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतांना त्याला नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले.
अधिकाऱ्यांनी जाणून घेतली घटनेची माहिती
लग्नसमारंभात प्रेम धनगर याच्या पाठीत चॉपर खुपसून त्याचा खूपसून खून केल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.
चॉपर अडकून पडल्यामुळे झाला दुर्देवी मृत्यू
दहा ते पंधरा जणांकडून प्रेमला मारहाण करण्यात आली. त्यानंतर जमावातील एकाने त्याच्या पाठीत चॉपर खूपसला. दरम्यान, तो चॉपर खोलवर जावून अडकल्यामुळेच प्रेमचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, मारहाण करणाऱ्या जमावातील दहा ते पंधरा जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. प्रेमच्या पश्चात आई, वडील व विवाहित बहिण असा परिवार आहे.
















