जळगाव (प्रतिनिधी) देश, गाव, समाज आपला आहे. युवकांनी जागरूक होत थोडासा वेळ देशासाठी आणि समाजसेवेसाठी द्यायला हवा. तुमचा उत्साहामुळे देशाची प्रगती होईल, आपण आत्मनिर्भर होऊ शकतो. युवकांनी पुढाकार घेतल्यास सर्वांची साथ मिळेल आणि देशाचा विकास होऊ शकतो. राष्ट्र निर्माण करण्यासाठी युवकांनी मनात संकल्प करणे आवश्यक आहे आणि त्या संकल्पात कुठलाही विकल्प, पर्याय ठेवू नये, असे नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र, गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे यांनी सांगितले.
केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे हे तीन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. मंगळवारी दुपारी त्यांनी जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आणि युवकांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेष पाटील, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, नाशिक नेहरू युवा केंद्राचे अधिकारी सुनील पंजे, लेखापाल अजिंक्य गवळी, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी रणजित राजपूत, चेतन वाणी आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी तेजस पाटील, हेतल पाटील, कोमल महाजन, सुश्मिता भालेराव, शंकर पगारे, नेहा पवार, उमेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.
नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रास्ताविक करताना, गेल्या कार्यकाळात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच आगामी पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी कॅच द रेन मिशन आतापासून प्रभावीपणे राबवावे. स्वच्छ भारत अभियान तळागाळापर्यंत पोहचविणे आपले कर्तव्य असून आपण स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करीत इतरांना प्रोत्साहित करावे, असे डागर म्हणाले.
राज्य संचालक प्रकाशकुमार मनुरे यांनी पुढे सांगितले, संधी शोधणे आपल्या हातात आहे. ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करणे हे एक कठीण काम आहे. ते नसल्यास प्रचंड मेहनत करावी लागते. आजच्या युवकांनी संधीचे सोने करायला हवे. आपण नेहरू युवा केंद्रात येण्यापूर्वी आपल्याला किती लोक ओळखतात आणि आल्यानंतर किती लोक ओळखतात हे महत्त्वाचे असते. जोखीम प्रत्येक क्षेत्रात आहे. जोखीम घ्यायला शिका. आयुष्यात पुढे जायचे असेल, प्रगती करायची असेल तर ध्येय निश्चित हवे. मुंबईला जायचे ठरवले तर इगतपुरीहून परतीचा प्रवास करणे पूर्णत्व नव्हे. सूर्यासारखे चमकायचे असेल तर उन्हाचे चटके सहन करायलाच लागतील, असे ते म्हणाले.
खासदारांनी केल्या युवकांशी दिलखुलास गप्पा
खा.उन्मेष पाटील यांनी, नेहरू युवा केंद्र हे युवांसाठी उत्कृष्ठ व्यासपीठ आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित अशाच एका युवा संसद कार्यक्रमाबद्दल मला समजले होते. चाळीसगावहून येत मी जळगाव गाठले आणि माझे वक्तृत्व सादर केले. परीक्षकांनी गुण जाहीर केल्यावर मी प्रथम आलो होतो. तेव्हाच मी स्वतःला ओळखले आणि तिथून नेतृत्व गुण आणि राजकारणाची आवड निर्माण झाली असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित युवक-युवतींशी खा.उन्मेष पाटील यांनी दिलखुलास गप्पा केल्या. युवांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांचे समाधान देखील केले. तासभर प्रश्नोत्तरे सुरु होती.