कोल्हापूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील गवशीपैकी पाटीलवाडी येथे स्पर्धेच्या नावाखाली तरुणांनी धिंगाणा घातला. पाटीलवाडी गावातील काही तरुणांनी विनापरवाना क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करुन चक्क शिवारात ‘चिअर्स गर्ल्स’ आणून धिंगाणा घातल्याचे उघड झाले आहे.
क्रिकेट सामन्याला ‘चिअर्स गर्ल्स’ येणार म्हणून काम धंदा सोडून हजारो तरुण शिवारात ‘चिअर्स गर्ल्स’ला पाहायला आले होते. यावेळी ‘चिअर्स गर्ल्स’नी गाण्यावर ठेका धारताच उपस्थित असणाऱ्या तरुणांनी ‘चिअर्स गर्ल्स’चे हात पकडून नाचायला सुरुवात केली. असा प्रकार तीन ते चार तास सुरू होता. महत्वाचे म्हणजे एका वडिलांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या क्रिकेट स्पर्धा भरवल्या होत्या. कोल्हापुरातील या बर्थडे सेलिब्रेशनची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील गवशीपैकी पाटीलवाडी येथील रघुनाथ दिनकर पाटील याच्या मुलाचा वाढदिवस होता. हा वाढदिवस त्याने धुमधडाक्यात साजरा केला. या निमित्ताने गावात त्याने क्रिकेट स्पर्धाही भरवली होती. त्यासाठी त्याने मुंबईहून चिअर्स गर्ल्स आणल्या. चौकार आणि षटकारांचा वर्षाव सुरू झाला आणि दुसरीकडे चिअर्स गर्ल्सनी ताल धरला. त्या थिरकू लागल्याने गावातील तरूणाईलाही चांगलाच जोश आला आणि शिवारात तरूणांनी धिंगाणा घातला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम करण्यास परवानगी नाही. तरीही या ठिकाणी सामाजिक सुरक्षेचे, अंतराचे सर्व नियम पायदळी तुडवून धिंगाणा घातला गेला. या कार्यक्रमात कुणीच मास्क घातलेले नव्हते. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तालुकाभर त्याची चर्चा सुरू झाली.
८ ते १० डिसेंबर अशा तीन दिवस रंगलेल्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ पोलिसापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी स्पर्धेचे आयोजक रघुनाथ पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही स्पर्धा आणखी काही दिवस चालणार होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.