जळगाव (प्रतिनिधी) लाच देणे आणि घेणे हा दंडनीय अपराध असून संपूर्ण समाजस्वास्थ्यासाठी तरुणाईसह समाजातील सर्वच घटकांनी भ्रष्टाचार निर्मूलनार्थ शासनास सहकार्य करावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था संचालित नूतन मराठा महाविद्यालयातील व्याख्यानात १९८८ चा भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील तरतुदी या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.एन जे.पाटील व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी केले. मान्यवरांचे स्वागत उपप्राचार्य यांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांनी केले. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.एन जे पाटील यांनी तरुणांना भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्यात सहभागी होऊन सामाजिक दायित्व निभवावे असे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ.राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन व प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील, जनार्दन चौधरी, मनोज जोशी, महेश सोमवंशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर, कर्मचारी, विद्यार्थी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.