जळगाव (प्रतिनिधी) देशातील प्रत्येक युवकाला नोकरीकरिता विविध कंपन्या, संस्थांकडून संधी उपलब्ध आहेत. तसेच, उद्योगांच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी विविध भागभांडवलदेखील शासनाकडून उपलब्ध होत आहे. त्यामुळे युवकांनी रोजगारप्राप्ती करून देशाच्या विकासालादेखील हातभार लावला पाहिजे. देशाच्या विकासाची धुरा तरुणांच्याच खांद्यावर आहे, असे प्रतिपादन जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी केले.
सुर्या फाऊंडेशनतर्फे खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण करणारा “खान्देश करिअर महोत्सव” दि. १०, ११ व १२ एप्रिल रोजी जळगाव येथे शिवतीर्थ मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन दि.१० एप्रिल रोजी सकाळी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सूर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. अर्चना सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सकाळी शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते नारळ वाढवून व फित कापून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावनेत डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी महोत्सव घेण्यामागील भूमिका विशद केली.
संध्याकाळी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व प्रतिमा पूजन करीत झाले. प्रसंगी भारती सोनवणे, साधनाताई महाजन, अस्मिताताई पाटील, गीतांजली ठाकरे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख डॉ. अमृता सोनवणे, मृणाल पाटील, संगीता पाटील, सुधा काबरा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एकपात्री प्रयोग, ब्रायडल शो यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना नारीशक्ती पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन मंजुषा अडावदकर यांनी केले. आभार डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी मानले. खान्देशासह राज्यातील हजारो विद्यार्थी आणि पालकांना याचा फायदा होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि उद्योगजगतातील मान्यवर मार्गदर्शन करीत आहे.
एकपात्री प्रयोग अन् विविध खेळांत प्रेक्षकांचा सहभाग
उदघाटन झाल्यावर धुळे जिल्ह्यातील कलाकार प्रवीण माळी यांचा एकपात्री आयतं पोयतं सख्यान हा प्रयोग सादर झाला. कार्यक्रमात प्रवीण माळी यांनी उपस्थित रसिकांना हसवून लोटपोट केले. यानंतर प्रेक्षकांसाठी काही खेळ घेण्यात आले. यातून विजेते ठरलेल्या महिलेला सुरेश कलेक्शनच्या वतीने पैठणी भेट देण्यात आली.
अभिनेत्री अलका कुबल यांचे मार्गदर्शन
पहिल्या दिवशी महिला सशक्तीकरण व करिअरच्या संधींबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल विशेष यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश कलेक्शनतर्फे अलका कुबल यांना पैठणी भेट देण्यात आली. शिक्षण हे महिला सक्षमीकरणासाठी सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक आहे, कारण शिक्षण हे ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास मिळविण्यास मदत करू शकते. जे महिलांना त्यांचे जीवन आणि त्यांच्या कुटुंबांचे आणि समुदायांचे जीवन सुधारण्यास मदत करू शकते. आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य आणि कल्याण, राजकीय सहभाग आणि सामाजिक सक्षमीकरण यामार्फत महिला स्वतःचे सक्षमीकरण करू शकतात, असे अलका कुबल यांनी मार्गदर्शन केले.
महिलांसाठी ब्रायडल शो
सायंकाळी ६.३० वाजता महिलांसाठी खास ब्रायडल शो आयोजित करण्यात आला होता. त्यात ५० पेक्षा जास्त संस्था, ब्युटी पार्लरने सहभाग नोंदवला. यावेळी विविध मॉडेलने सादरीकरण करून उपस्थितांसह परीक्षकांची मने जिंकली.
आज स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व व्याख्यान
दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता कवी अनंतराव राऊत यांचे मैत्री आणि करियर संदर्भात विशेष व्याख्यान तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. प्रसंगी इतर मान्यवर तज्ज्ञ विविध परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण टिप्स व मार्गदर्शन देणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, लाभ घेण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेऊन करिअरच्या योग्य दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रत्येक दिवशी आकर्षक बक्षिसे आणि कार्यशाळा असणार आहेत. हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत शिवतीर्थ मैदानावर असणार आहे. अधिक माहितीसाठी 8668416383, 993278904, 9175675651 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.