जळगाव (प्रतिनिधी) काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या मनीष भंगाळेची भेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडविस यांच्यासोबत घालून दिली होती, असा खळबळजनक आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, कृपाशंकर सिंग यांना म्हणूनच एमएलसी देण्यात आल्याचेही खडसे म्हणाले.
दाऊदच्या पत्नीशी आपले संबंध असल्याचे आपल्यावर आरोप करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळे याचीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी रात्री दीड वाजता भेट का घेतली?, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले होता. या विषयावर आज पुन्हा एकदा खडसे म्हणाले की, मनीष भंगाळे याची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून देण्यात काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांचा हात आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या मनीष भंगाळेची फडणीस यांच्याशी भेट घालून देण्याच्या बदल्यात कृपाशंकर सिंग यांच्यावर असलेले विविध गुन्ह्यात खटला चालवण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक होती, मात्र ही परवानगी सरकारने दिली नसल्याने ते या सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष सुटले. एवढंच नव्हे तर कृपाशंकर सिंग यांना एमएलसी देण्यात आली. मनीष भंगाळेला रात्री दीड वाजता भेटण्यासाठी यांच्या जवळ वेळ होता. मात्र मी मंत्री असून देखील मला वेळ दिला जात नव्हता. याशिवाय हॅकर असलेल्या मनीष भंगाळेवर आजपर्यंत कोणती कारवाई का झाली नाही? त्याच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? या मागच कारण काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. तसेच पक्षात जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण पक्षाला हे प्रश्न विचारत राहणार असल्याचे खडसे यांनी म्हटले.