धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलतोय असल्याचे सांगून धमकी दिली होती. याप्रकरणी आज धरणगाव शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी धरणगाव तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
गुलाबराव वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी गेल्या 35 वर्षा पासून शिवसेना ह्या संघटनेचे काम करीत आहे. शिवसेना या संघटनेचे कार्यालय प्रमुख पासुन ते 20 वर्ष शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख म्हणुन काम करतोय. सद्या मी जळगांव जिल्हा शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणुन काम करीत आहे.
शिवसेनेत काम करीत असतांना अनेकदा संघटनेची ध्येय धोरण राबवित असतांना अनेक लोकांच्या विरोधात काम करावे लागते. त्यामुळेच मला सुमारे 10-15 वर्षा पुर्वीसुध्दा अनेकदा जिवेठार मारण्याचा धमक्या मिळालेल्या होत्या. त्यावेळेस मी सदर आपल्या कार्यालयात पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यावेळेस आपल्या कार्यालयाने चौकशी करुन मला पोलिस संरक्षण दिले होते. त्यामुळे माझ्या जिवाचे रक्षण होऊन मला त्यावेळेस न्याय मिळालेला होता.
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीती अस्थिरतेची झालेली आहे. शिवसेना या पक्षाचे 39 आमदार यांनी बंडखोरी केलेली असून त्यात जिल्ह्यातील 5 आमदार असून त्यातील 3 आमदार हे मी काम करीत असलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघातील आहेत. त्यांनी केलेल्या बंडामुळे जन माणसात त्यांचाविरुध्द वातावरण तयार झालेले आहे. शिवसेना पक्षाच्या मी एकनिष्ठ शिवसैनिक पदाधिकारी असल्याने मी सर्व बंडखोराविरुध्द जिल्हा भरात आवाज उठविलेला आहे. मला जिल्ह्या भरातून तसेच मी राहतो त्या मतदार संघातून मला मोठया प्रमाणावर समर्थन मिळत आहे. याच बाबीचा माझ्या विरोधकांनी तसेच बंडखोर आमदार व समर्थकांना वाईट वाटत आहे. त्यामुळे माझा वैयक्तीक व्देष व मत्सर त्यांना वाटू लागलेला आहे. त्यांचा माझ्या बाबतीचा व्देषयुक्त हेतू वाढलेला आहे.
दिनांक २ जुलै रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार बंडखोर आमदारांविरुध्द जळगाव या ठिकाणी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळेस दुपारी 14.54 वाजता 9665362814 या मोबाईल क्रमांकावरुन माझ्या मोबाईलवर फोन आला. त्यावेळेस त्या अनोळखी इसमाने मला धमकी दिली की, बंडखोर आमदारांविरुध्द एकही शब्द बोलू नको. अन्यथा तुला जिवेठार मारण्यात येईल. सदर धमकी मिळाल्यामुळे मी व माझ्या सोबतचे कायकर्ते यांनी जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनला CRPC 155 प्रमाणे NCR No. 210/2022 नुसार भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 507 नुसार प्रथम खबर नोंदविली.
सदरची धमकी मिळाल्यामुळे माझे कुटूंबिय तसेच माझे समर्थक, कायकर्ते अस्वस्थ झालेले आहेत. सदर विरोधक हे अतिशय गुंड प्रवृत्तीचे असल्याने ते बोलल्याप्रमाणे वागतील अशी मला दाट शक्यता आहे. अॅड. सनी पुनामिया यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना मुख्य न्यायमुर्ती मंजुला चेल्लुर व न्यायमुर्ती एम. एस. सोनप यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे की, “एखाद्या व्यक्तीच्या जिवाला धोका असेल तरच त्या व्यक्तीला पोलिस सुरक्षा दिली जाईल”. याच अनुषंगाने सदर प्रकरणात देखील माझा जिवाला धोका असल्यामुळे मला पोलिस सुरक्षा पुरवावी. तसेच नमुद अर्जाची सखोल चौकशी करुन मला तात्काळ पोलिस संरक्षण पुरविण्यात यावे. मला पोलिस संरक्षण देणे नाकारल्यास माझा जिवाची संपुर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहेत.