जळगाव (प्रतिनिधी) येथील जळगाव-औरंगाबाद रोडवरील कुसुंबा जकात नाक्याजवळ १३ सप्टेंबर रोजी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या गँगवार मधील चार आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.
सोनू उर्फ कुलदिप पोपट आढळे (वय-२८) रा. समता नगर, मुकेश उर्फ पप्पू रमेश शिरसाठ (वय-२२) रा. हुडको पिंप्राळा, अजय देवीदास सपकाळे (वय-२१) रा. बुध्दविहार हुडको पिंप्राळा आणि राकेश अशोक सपकाळे (वय-२२) रा. समता नगर अशी चार जणांना अटक करण्यात आली आहे. निकेश राजपूत याच्या अंत्ययात्रेला आलेल्या देान गुन्हेगारी टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद उफाळून आला. अंत्यविधीत एकमेकांकडे बघण्यावरून देान्ही टोळ्यांमध्ये लोखंडी रॉड, चॉपर, चाकू लाठ्या-काठ्यांसह तुंबळ हाणामारी झाली होती. जखमी विशाल अहिरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल, किरण गव्हाणे, आशू मोरे, विशाल पाटील, दीपक तरटे हे अंत्ययात्रेतून परतत असताना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या किरण खर्चे, आकाश परदेशी याच्यासह काही तरुणांनी चॉपरने विशालवर वार केले. या फिर्यादीवरून किरण खर्चे, आकाश परदेशी, छोटा किरण याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसऱ्या फिर्यादीत जखमी किरण खर्चे याने दिलेल्या जबाबनुसार, अंत्ययात्रेतून घरी परतत असताना विशाल अहिरे, किरण गव्हाणे, गौरव सपकाळे, दीपक तरटे, राकेश सपकाळे याच्यासह दोन जणांनी किरणसह मित्रांवर हल्ला चढविला. याचवेळी विशाल अहिरे याने किरणच्या डोक्यावर व कानावर चॉपरने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी किरण चितळे याने किरण खर्चेला तात्काळ रिक्षात टाकून खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी विशाल अहिरे, किरण गव्हाणे, गौरव सपकाळे, दीपक तरटे, राकेश सपकाळे याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक संदिप हजारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, गोविंदा पाटिल यांच्या पथकाने या प्रकरणी आशू सुरेश मोरे (वय १९, रा. रामेश्वर कॉलनी), दीपक लक्ष्मण तरटे (वय २४), किरण शिवाजी गव्हाणे (वय २५), विशाल भगवान पाटील (वय २१) अशा चौघाना रात्री उशिरा ताब्यात घेतले होते.