जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मुक्ताईनगर येथील सभेच्या आधीच एका हाॅटेलमध्ये त्यांच्याभोवती साध्या वेशातील पोलिसांचा गराडा आहे. त्यांना नजरकैदेत ठेवल्याचेही बोलले जात आहे. अगदी खुद्द अंधारे यांनी देखील तसा आरोप केला आहे.
अंधारे म्हणाल्या, महाप्रबोधन यात्रेवरून पोलिसांचा माझ्यावर आक्षेप नाही. मी सभेत कुठल्याही आक्षेपार्ह भाषेचा वापर केला नाही. असंसदीय भाषेचा वापर केला नाही. परंतु, तरी देखील माझ्या सभांवर बंदी घालणे अयोग्य आहे. मी ऑनलाईन सभा घेणार आहे. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, गुलाबराव पाटील घाबरले आहेत. ते बिथरले आहेत. ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी स्वःत सांगितले की,आम्ही सभेवर बंदी घालू शकतो तसा आमचा दरारा असल्याचे असे ते म्हणाले होते. पालकमंत्री पदाचा गैरवापर करीत असून सत्तेचाही गैरवापर करीत आहेत. त्यांचा दरारा, त्यांची गुंडगिरी हे सगळे ते लोकांसमोर मान्य करीत आहेत. परंतु, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र, या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर ते सत्तेसाठी आंधळे झाले आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मी कुणाबद्दलही सत्तेसाठी आकस बाळगणार नाही किंवा ममत्व बाळगणार नाही हे फडणवीस बोलले. परंतु ते सत्ताधाऱ्यांची बाजू घेत आहेत, जाणीवपूर्वक विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप देखील अंधारे यांनी केला आहे.