धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्यामुळे धरणगावात खळबळ उडाली आहे. भर वस्तीतून दुचाकी चोरीला गेल्यामुळे चोरट्यांचा हैदोस वाढल्याचे चित्र समोर आले असून या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात योगराज रामलाल खलाने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे चुलत मामा गुलाबराव वाघ यांच्या नावावर असलेली दुचाकी क्रमांक (एम.ए.च १९, सि.टी ४५०२) ही त्यांच्याकडून खाजगी कामाकरता वापरण्यासाठी ताब्यात घेतलेली होती. दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घराबाहेर शतपावली करताना गाडी घरासमोर लावलेली होती. परंतू पहाटे पाच वाजेच्या सुमारास घराबाहेर आल्यावर श्री.खलाणे यांच्या लक्षात आले की, दुचाकी चोरीस गेली आहे. याबाबत त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली. एवढेच नव्हे तर अमळनेर रस्त्यावरील शामखेड फाटा, जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच चोपडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गाडीचा शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. यामुळे श्री. खलाणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मोठा माळी वाडा सारख्या दाट लॉकवस्तीतून दुचाकी चोरीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या घरासमोर चोरी होत असेल सामान्य माणसाचे काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
















