जामनेर (प्रतिनिधी) डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंस (डीजीजीआय) अर्थात वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाच्या नाशिक युनिटने तालुक्यातील पहूर कसबे येथे धाड टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. डीजीजीआयचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिज भूषण त्रिपाठी यांच्या पथकाने बुधवारी ही धाड टाकली होती. दरम्यान, जीएसटी घोटाळ्याशी संबंधित हे धाडसत्र होते. त्यानुसार एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. दरम्यान, याप्रकरणी डीजीजीआयच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असल्याचे कळते.
गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाच्या नाशिक युनिटने ३ मार्च २०२१ रोजी जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे धाड टाकली आणि पंचनामा केला. त्यानुसार या पथकात डीजीजीआईचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिज भूषण त्रिपाठी यांच्यासह गुप्तचर अधिकार सत्येंद्रकुमार शर्मा यांचा समावेश होता. या पथकाजवळ असलेल्या सर्च वॉरंटवर (क्र३०/२०२०-२१) हे नागपूर येथील डीजीजीआयचे अॅडीशनल डायरेक्टर प्रदीप गुरुमूर्ती यांची स्वाक्षरी होती. या पथकाने गावातीलच निलेश निवृत्ती घोंगडे (वय-२५, रा.पहूर कसबे) आणि सतीश राजू जाधव (वय-२६, रा. पहूर कसबे) या दोन पंचांना धाडसत्राचा उद्देश सांगत आपल्या सोबत घटनास्थळी नेले.
आयकर भरणारे एम/एस कृष्णा स्टील (GSTIN 27BXRPK1228BIZM) आणि ए.एस. स्टील (GSTIN 27KENPS0948A1Z5) या दोघं कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा १३७३, संतोषी माता नगर पहूर पेठ, पहूर असा होता. परंतू पथकाला ही जागा आणि त्यांचे मालक बराच वेळ सापडले नाहीत. बऱ्याच प्रयत्नानंतर अधिकाऱ्यांनी कृष्णा स्टीलचे मालक प्रवीण विठ्ठल कुमावतशी मोबाईलवरून संवाद साधला. तेव्हा त्यांना कळले की, ए.एस स्टीललॅडचे अशोक सखाराम सुरवाडे हे मालक आहेत. त्यानंतर प्रवीण कुमावत यांनी अधिकाऱ्यांना फोनवर सिव्हील हॉस्पिटल समोरील संतोषी माता नगर येथे पोहचण्यास सांगितले.
घटनास्थळी अधिकारी आणि पंच पोहचत नाही तोच तेथे प्रवीण कुमावत पोहचला. त्याने संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या वेदांत मेडिकल आणि जनरल स्टोअर्सवर नेले. त्याठिकाणी दुकानात फार्मसिस्ट तौसीफ खान हा उपस्थित होता. अधिकाऱ्यांनी प्रवीण कुमावतची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, कृष्णा स्टील ही फर्म पिंटू इटकारेने माझ्या नावावर तयार केली. तसेच या मोबदल्यात त्याने मला ८ महिने ८ ते १२ हजार रुपये महिना देत होता. तसेच संबंधित पत्त्यावर कृष्णा स्टीलशी संबंधित कुठलास व्यवसाय येथे चालत नाही. त्याच प्रकारे या कंपनीशी संबंधित कोणतेच कागदपत्र या ठिकाणी उपलब्ध नाहीत.
साधारण सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास त्याठिकाणी अशोक सखाराम सुरवाडे आणि कैलास कौतिक भारुडे ही दोन व्यक्ती पोहचली. यातील अशोक सुरवाडे याने अधिकाऱ्यांना सांगितले की, ए.एस स्टील या कंपनीचा संचालक असल्याबाबत बाबत आपल्याला काहीच माहित नाही. तर कैलास भारुडे याने सांगितले की, तो साई इंटरप्राईजेसचा संचालक आहे. परंतू ही फर्म त्याचा शालक पिंटू इटकारे याने बनविली होती. भारुडेने पुढे सांगितले की, सुरेशचंद्र हुकुमचंद्र जाधवानी हा सर्व कटाचा मुख्य लाभार्थी तसेच मुख्यसूत्रधार आहे. तसेच पिंटू हा जाधवानी आणि ओम प्रकाश सचदेव यांच्या सुचनेनुसार सर्व काम करत होता.
जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून संपूर्ण देशासाठी एक सारखी कर रचना प्रणाली लागू करण्यात आली. त्यामागे अप्रत्यक्ष कर रचना सोपी करणे आणि कर चोरी पकडणे हे उद्दिष्ट होते. केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाच्या जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने पहूरमध्ये वस्तू व सेवा कर चुकवेगिरीचा एक मोठा घोटाळा शोधून काढला, अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. परंतू याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीसोबत संपर्क होऊ न शकल्याने अधिकृत कुणाचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या बनावट देयकांच्या मदतीने खरेदी विक्रीचे खोटे व्यवहार कागदोपत्री उभे करणे, त्यांचे आपापसात चक्रीय पद्धतीचे व्यवहार दाखविणे आणि त्या आधारे जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडीत मिळविणे असे या घोटाळ्याचे स्वरूप आहे. तज्ज्ञांच्या मते जीएसटी कायद्यात वस्तूची विक्री एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला होत असताना विक्री करणाऱ्या कंपनीला विक्रीच्या बिलात समोरच्या कंपनीकडून (खरेदी करणाऱ्या कंपनी कडून) जीएसटीची आकारणी करत पुढे स्वतःच्या जीएसटी कारभारात सूट म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडीट मिळवता येते. पहूर येथील प्रकारात हेच इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी खोट्या कंपन्या, त्यांची खोटी विक्री देयके वापरण्यात आली असावीत,अशी देखील बोलले जात आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते खोटे व्यवहार, पत्ते दाखवत जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटच्या सोयीचा गैरफायदा घेणारे जिल्ह्यात अनेक जण आहेत.