जालना (वृत्तसंस्था) परतूर तालुक्यातील आष्टीजवळील संकनपुरी येथील ओढ्यात काल ३ शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. अजय रघुनाथ टेकाळे (वय १३), करण बाळासाहेब नाचण (१०) आणि उमेश बाबासाहेब नाचण (वय १०), अशी मयत मुलांची नावं आहेत. दरम्यान, तिघांचे दप्तर ओढ्याच्या काठावर ठेवल्याने पोलिसांच्या तपास कामात मदत झाली.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे अजय रघुनाथ टेकाळे, करण बाळासाहेब नाचण आणि उमेश बाबासाहेब नाचण हे तिघं मित्र सकाळी साडेदहा वाजता शाळा सुटल्यावर ओढ्यात पोहण्यासाठी गेले होते. दुसरीकडे शाळा सुटल्यावर दोन तास उलटले तरीही मुले घरी आली नाहीत, याची चौकशी करण्यासाठी पालकांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी कोणीतरी मुलांची दप्तरे ही ओढ्याजवळ असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली शोधाशोध सुरू केली. बुडालेली मुलं दिसून आल्याने काहींनी पाण्यात उड्या घेतल्या. पण तोपर्यंत मुलांचा मृत्यू झालेला होता. बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढल्यावर आई- वडिलांसह अन्य नातेवाइकांनी देखील हंबरडा फोडला. त्यांचे दुःख पाहून गावकरी देखील शोकमग्न झाले होते.