फैजपूर (प्रतिनिधी) ‘आपल्या कामावर श्रद्धा ठेवा, ही श्रद्धाच तुम्हाला सन्मान मिळवून देईल, तुम्ही तुमच्या कलेवर श्रध्दा ठेवली म्हणून आजचा सन्मान तुम्हाला मिळाला, असे प्रतिपादन गणेशोत्सवा निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ऑन-लाईन गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण प्रसंगी महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी केले.
आ. गं. हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथील विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवानिमित्ताने घेण्यात आलेल्या ऑन-लाईन गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना नुकतेच पारितोषिक वितरण करण्यात आले. दि २२ सप्टेंबर रोज मंगळवार या दिवशी सतपंथरत्न प.पु महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन हरिजी महाराज आणि प.पु.स.गु.शास्त्री स्वामी भक्ती किशोरदासजी या संतद्वयीच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. हा सोहळा सतपंथ मंदिर संस्थान फैजपूर येथे पार पडला.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात लॉकडाऊन असल्याने शाळा बंद होत्या. ऑनलाइन अभ्यास प्रक्रिया सुरू असल्याने इयत्ता पाचवी ते दहावी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन कलाध्यापक श्री नंदू पाटील सर यांनी केले होते . त्यात सामील झालेल्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचा, शेतातील मातीचा व तत्सम माध्यमांचा वापर करून, गणपतीच्या मूर्ती तयार केल्या व त्यांच्यातील उत्कृष्ट कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यात प्रथम क्रमांक पियुष राजेंद्र मेथाडकर याने पटकावला. तर द्वितीय क्रमांक यश शिवदत्त सानप व तृतीय क्रमांक साई भागवत चौधरी या विद्यार्थ्यांने मिळवला.
या तिघांचा महामंडलेश्वर श्री जनार्दनहरिजी महाराज आणि शास्त्री स्वामी भक्तीकिशोरदासजी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून, त्यांना पारितोषिक म्हणून अनुक्रमे पाचशे, तीनशे व दोनशे रुपये रोख व प्रत्येकी “वचनांमृत” हा पवित्र ग्रंथ भेट दिला. याप्रसंगी दोन्ही संतद्वयी यांचे शाल पुष्पहार अर्पण करून मुख्याध्यापक श्री सी सी सपकाळे यांनी सन्मान केला. तर उपस्थित सर्व पालकांचे सुद्धा या संतद्वयीनी आशीर्वादस्वरूप गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या स्वागताने पालक भारावले. त्यानंतर आदरणीय शास्त्री स्वामी भक्तीकिशोरदासजी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनचे कौतुक करत पालकांनी आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहित करून त्यांना लक्षपूर्वक पुढे सरकण्यास उद्युक्त करावे असा सल्ला दिला. तसेच मुख्याध्यापक सी सी सपकाळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दनहरिजी महाराज यांनी आपल्या आशिर्वचनात ‘आपल्या कामावर श्रद्धा ठेवा, ही श्रद्धाच तुम्हाला सन्मान मिळवून देईल, तुम्ही तुमच्या कलेवर श्रध्दा ठेवली म्हणून आजचा सन्मान तुम्हाला मिळाला ‘, तसेच संत आणि मंदिरे ही सर्वांसाठी खुले आहेत. याचा व्यासपीठ म्हणून उपयोग करावा .असा समयोचित उपदेश दिला. आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले.