नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार २४७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ८ हजार १५ इतकी झाली आहे. यापैकी १० लाख १३ हजार ९६४ जणांवर उपचार सुरु आहेत. तर ८५ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४२ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जगात अमेरिकानंतर भारतामध्ये करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ९५ हजार ८८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात शुक्रवारी २१ हजार ६५६ केस आल्या. येथे आतापर्यंत ११ लाख ६७ हजार ४९६ केस आल्या आहेत. ८ लाख ३४ हजार ४३२ संक्रमित झाले आहेत. तर ३ लाख ८८७ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ३१ हजार ७९१ जणांचा मृत्यू झाला आहे.