जळगाव (प्रतिनिधी) विधानरिषदेतील काही जागा ऑक्टोबर महिन्यात रिक्त होत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागा आहेत. त्यापैकी एका जागेवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना संधी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यात एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करत आहेत. राज्यपाल, राज्यसभा आणि विधानपरिषदेत शब्द देऊन डावलण्यात आल्यानंतर खडसे यांच्यावर पक्ष सोडण्याबाबत कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. खडसे देखील आक्रमक झाले असून पक्षातील अनेकांबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे कधीकाळी जिल्ह्यात मोठी ताकद असलेली राष्ट्रवादी आज कमकुवत झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी शक्ती मिळावी म्हणून एकनाथराव खडसे यांच्या रूपाने राष्ट्रवादी जिल्ह्यासह राज्याच्या दृष्टीने दिग्गज नेता म्हणून चाचपणी करत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढील आठवड्यातील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यात याबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना थेट शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते.