नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना महामारीमुळे सौदी अरेबियात नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या ४५० भारतीयांवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली. या भीक मागणाऱ्या भारतीयांची सौदीच्या प्रशासनाने थेट डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. ज्या भारतीयांची डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी झाली आहे त्यांपैकी अनेक कामगारांच्या कामाचा परवाना संपल्याने त्यांना भीक मागण्यास प्रवृत्त व्हावे लागले आहे. त्यानंतर सौदीच्या प्रशासनाने थेट डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी केली. डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आलेल्या कामगारांमध्ये ३९ जण उत्तर प्रदेश, १० जण बिहार, ५ तेलंगणा तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी ४ जण आहेत. यांपैकी काही कामगारांची मानसिक स्थिती बिघडली असून ते निराश झाले आहेत. यांपैकी एका कामगाराने तक्रार करताना म्हटलं की, “आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्हाला आमच्या परिस्थितीमुळं भीक मागण्याशिवाय पर्याय राहिला नाही कारण आमच्याकडे कोणतीही नोकरी नाही. आता आम्ही इथं डिटेन्शन सेंटरमध्ये बिकट जीवन जगत आहोत.”