मुंबई प्रतिनिधी । महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी 15 सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. या मागणीनंतर अवघ्या तीन दिवसात (18 सप्टेंबर) अनिल परब यांनी याबाबतचा निर्णय घेत मागणीला परवानगी दिली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी विशेष एसटी बसेस सुरु करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली. येत्या सोमवारपासून पनवेल, डोंबिवली, विरार या ठिकाणाहून विशेष एसटी बसेस सुरु करण्यात येणार आहे, असेही अनिल परब यांनी सांगितले. त्यानुसार मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना विशेष बससेवा सुरु केली जाणार आहे. महिलांची ने-आण करण्यासाठी एसटीने त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार पनवेल-मंत्रालय, डोंबिवली-मंत्रालय आणि विरार-मंत्रालय या मार्गावर महिला विशेष बस चालवल्या जाणार आहे. येत्या सोमवारी 21 सप्टेंबरपासून या बस फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिरिक्त फेऱ्या या मार्गावर वाढवण्यात येतील, असे एसटी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
दरम्यान संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. बसने प्रवास करण्याकरिता दररोज तास-दोन तास बसची प्रतीक्षा तसेच बस उपलब्ध झाल्यानंतरही त्यांना दोन-तीन तास प्रवास बसने करावा लागत आहे. विशेषतः महानगरामध्ये बसने येण्याजाण्यास खूप अडचणी येत आहे. बससेवेला होत असलेली गर्दी पाहता त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय आणि खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणी ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती.