मुक्ताईनगर (प्रतिनिधी) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे हे कोरोना आजारातून मुक्त व्हावेत, यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज शिरसाळा येथील हनुमान मंदिरात आरती केली. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून त्यात आमदारांकडून सोशल डिस्टेंसिंगचं उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे, यावेळी अनेकांच्या तोंडावर मास्क देखील लावलेले नव्हते. दरम्यान, कठीण काळात लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे यांनी ‘द क्लियर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.
सध्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून राज्यातही कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, गर्दीची ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन केले आहे. परंतू सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही आपल्याच सरकारच्या आवाहनाकडे आमदार चंद्द्रकांत पाटील यांनी दुर्लक्ष केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि कार्यकर्त्यांनी शिरसाळा येथील हनुमान मंदिरात आज होम हवन केले. दुसरीकडे मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊन लागल्या पासून हनुमान मंदिर हे भाविकांसाठी बंद आहे. मागील काही महिन्यांपासून हनुमान भक्त हे मंदिराच्या बंद असलेल्या मुख्य दरवाजावरच बाहेरून दर्शन घेत आहेत.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन हनुमानाची आरती केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टेंसिंगचं उल्लंघनसह अनेकांनी मास्क लावलेले नव्हते. याबाबत जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे यांनी ‘द क्लियर न्यूज’ सोबत बोलतांना सांगितले की, अशा कठीण काळात लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे. आपण जनतेसमोर आदर्श घालून दिला पाहिजे. उलट आम्ही किती दिवस झाले मंदिरं उघडावे, अशी मागणी करतोय. परंतू राज्य सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतेय. आज सोशल मिडीयावर आमदारांचा व्हिडीओ बघितला. त्याठिकाणी अनेकांनी मास्क लावलेला नव्हता. सर्वसामान्य माणसाकडून नियमाचे उल्लंघन झाले की, ५०० रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे याप्रकरणातही तोच नियम लागू लावला गेला पाहिजे, असे अपेक्षित आहे.