जळगाव (प्रतिनिधी) ग्राहकांना खुल्या स्वरुपात विक्री होणारी मिठाई सुरक्षित मिळावी म्हणून 1 ऑक्टोबर, 2020 पासून खुल्या मिठाईवरही बेस्ट बिफोर डेट (BEST BEFOR DATE, या तारखेपर्यंत वापरण्यास सुरक्षित) असे ठळकपणे प्रसिध्द करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील मिठाई उत्पादकांनी कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) यो. कों. बेंडकुळे यांनी दिले आहेत.
मिठाई व दुग्धजन्य पदार्थ हे नाशवंत असल्याने त्यापासून मानवी शरीरावर दुष्परिणाम व अन्न विषबाधेची शक्यता गृहीत धरून तसेच सार्वजनिक आरोग्याचा विचार करून अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण यांनी ग्राहकास खुल्या स्वरुपातही मिठाई सुरक्षित मिळण्याच्या दृष्टिकोनातून 1 ऑक्टोबर, 2020 पासून खुल्या मिठाईला बेस्ट बिफोर डेट प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे.
त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व मिठाई उत्पादक, विक्रेते, हलवाई, हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्याकडे विक्री होणाऱ्या खुल्या मिठाईवर बेस्ट बिफोर डेट प्रदर्शित करावे. या तरतुदीचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहील, असेही सहाय्यक आयुक्त श्री. बेंडकुळे यांनी म्हटले आहे.