जळगाव (प्रतिनिधी) अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्यात सापडले जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारागृहातील भोंगळ कारभार, अन्यायकारक वागणुकीची माहिती देणाऱ्या कैद्यांनी लिहिल्लेया दोन चिठ्ठ्या सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन बंदी असलेला चिन्या उर्फ रवींद्र रमेश जगताप (वय ३५, रा. शिवाजीनगर, जळगाव) याचा ११ सप्टेंबर रोजी कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला होता. चिन्या याला कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटंुबीयांनी केला होता. यामुळे चिन्याच्या मृतदेहाचा पंचनामा न्यायाधीशांच्या समक्ष करण्यात आला. शवविच्छेदनही इनकॅमेरा करण्यात आले आहे. मृत्यूचे कारण राखीव ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. आता पुन्हा एकदा जिल्हा कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आल आहे. यात कारागृहाचे कर्मचारी हे कैद्यांना व विशेष करून नवीन कैद्यांना अमानुष मारहाण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बंद्यांच्या मागणीचे अर्ज घेऊन त्याला प्रत मिळाल्याची कॉपी दिली जात नाही. तसेच, जो दवाखाना, घरच्या जेवणाची मागणी करतो, त्यास जेलबदली मिळते किंवा मारहाण करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप यात करण्यात आले आहेत. कारागृहातील नितीन पाटील याच्यासह ११ कैद्यांनी जेवणासाठी अर्ज केला तर त्यांना दुसऱ्या कारागृहात पाठवले. भुसावळच्या काल्या नावाच्या कैद्याला १५ दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली आहे. तसेच बीएचआरचे अंकल यांनाही बळजबरीने दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात आले. या तीन गोष्टींचा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे. ही चिठ्ठी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.