जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेला दिलेली रुग्णवाहिका माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या चिरंजीवाने परत मागून घेतली होती. परंतू शिंदे गटाला डिवचत आज शिवसेनेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्ह्याच्या रुग्णसेवेत दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत.
शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदेंसह ४० आमदार बाहेर पडले होते. यात जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले होते. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यातून आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली होती. मात्र ते शिंद गटात सहभागी झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी ही रुग्णवाहिका शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वी परत मागून घेतली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या जिद्दीवर शिवसेनेने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्ह्यात रुग्णसेवेसाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जळगाव शहरातील महापालिकेसमोर रुग्ण्वाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, तुम्ही काय एक रुग्णवाहिका परत घेता. आम्ही दोन रुग्णवाहिका जळगाव शहराच्या रुग्णसेवेसाठी दिल्या आहेत, अशा शब्दात शिवसेना उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. यावेळी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, उपमहापौर कुलभुषण पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे आदी उपस्थित होते.