धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील हनुमान नगर परिसरात आज सकाळी विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून विविध नमुने घेतले तर दुसरीकडे मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. तिथे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन होणार आहे.
नेमकी घटना काय
कोमल संजय महाजन (वय 23), असे मयत विवाहितेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे मयता 6 महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे घातपात झाल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. शहरातील हनुमान नगरमध्ये आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास कोमल महाजन या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात आढळून आला. परंतू आपल्या मुलीने आत्महत्या नव्हे, तर तिचा घातपात झाल्याचं संशय मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मयत कोमल 6 महिन्यांची गर्भवती होती. आणि मागील दोन वर्षांपूर्वी तिने पती निलेश सोबत प्रेमविवाह केलेला होता.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
मृतदेह आढळल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले परंतु विवाहितेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला प्राचार्य केले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून विविध प्रकारचे नमुने घेतले त्यात प्रामुख्याने फिंगर प्रिंट्सचा समावेश होता. तसेच इतर नमुनेही घेतले.
मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन !
मयत कोमलच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे त्या ठिकाणी मृतदेहाची ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन केले जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी तुर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेणार आहेत. डीवायएसपी रावले, सपोनि जीभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, पोहेका विनोद संदानशिव, विजय धनगर यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी हजर होते.
महसूल कर्मचाऱ्यांसमोर पंचनामा तर शासकीय कर्मचारी साक्षीदार !
घटनेचे गांभीर्य आणि मयत विवाहितेच्या नातेवाईकांचा आरोप लक्षात घेता पोलिसांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केला. एवढेच नव्हे, तर या ठिकाणी साक्षीदार म्हणूनही पंचायत समितीचे कर्मचारी बोलवण्यात आले होते.