धरणगाव (प्रतिनिधी) आमच्या कार्यकर्त्याने कोणतीही खंडणी मागितलेली नाही. तसा कोणताही परिस्थितीजन्य पुरावा देखील नाहीय. याबाबत आज मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणार असून त्यांना आज बोलून सर्व वस्तुस्थिती सांगणार असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.
डी.जी पाटील पुढे म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्याने कोणतीही खंडणी मागितलेली नाही. तहसीलदार यांचा काही तरी गैरसमज झालेला दिसतोय. मी त्यांच्याशी देखील संपर्क साधून म्हणणं जाणून घेईल. खंडणीच्या गुन्ह्यासाठी सक्षम पुरावे लागतात. आमचा कार्यकर्ता चुकला असला तर आम्ही पाठीशी घालणार नाही. परंतू आमच्या कार्यकर्त्याने कोणतीही खंडणी मागितलेली नाही, त्यामुळे याबाबत आज मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणार आहे. दरम्यान, कुणी अधिकाऱ्याच्या दालनात घुसून खंडणी मागेल, अशी उत्तर प्रदेश, बिहार सारखी परिस्थिती महाराष्ट्रात नाहीय, असेही श्री. पाटील म्हणाले.
काय आहे प्रकरण
तालुक्यासह शहरातील अवैध वाळू वाहतूक बंद करावी, या आशयाची तक्रार कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी केली होती. परंतू तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तक्रारदार रामचंद्र माळी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. मागील काही दिवसापासून सोशल मीडियात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू माफियांविरुद्ध कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी सोशल मिडीयाच्या माधमातून आवाज उठविला होता. याचसंदर्भात मंगळवारी रामचंद्र माळी ही तक्रार देण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे गेले. परंतू तहसिलदारांनी अरे तुरेचे भाषा करत त्यांना हाकलून लावल्याचा आरोप रामचंद्र माळी यांनी केला होता. एवढेच नव्हे तर रामचंद्र माळी यांनी यासंदर्भात थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे फोनवरून तहसीलदार यांनी हाकलून लावले व पोलिसांची धमकी दिली, अशी तक्रार केली होती. त्यावर अभिजित राऊत यांनी मला तक्रार पाठवा मी कारवाई करायला सांगतो असे आश्वासन दिले. हीच तक्रार रामचंद्र माळी प्रांतधिकारी विनय गोसावी यांना व्हाटसअपला पाठवली. एवढेच नव्हे तर यासंदर्भात पुरावा म्हणून माळी यांनी पत्रकारांना जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेची ऑडीओ क्लिप, तक्रार पाठविल्याचे स्क्रीन शॉट, प्रांतअधिकाऱ्यांना पाठवलेल्या लेखी तक्रारीचे स्क्रीन शॉट पाठवले. याबाबत त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही मेलवरून तक्रार केली होती.