चाळीसगाव (प्रतिनिधी) बातमी घेत असताना तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायतचे उपसरपंच याने त्याच्या भावासह ‘दैनिक भास्कर’चे पत्रकार तथा आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना) महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव सूर्यकांत कदम यांच्यावर दि. 15 डिसेंबर रोजी चाळीसगाव पंचायत समितीच्या गेट समोर हल्ला करून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत आमच्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केल्यास खंडणीचा व इतर कोणताही खोटा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. याप्रकरणी पत्रकार कदम यांनी रवींद्र मोरे व सिद्धार्थ मोरे या दोघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून दोघांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.
पत्रकार कदम यांनी याबाबतचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्यासह पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि 15 डिसेंबर रोजी कदम हे चाळीसगाव पंचायत समिती समोरून जात असताना पिंपरखेड ता. चाळीसगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना बातमीचे निवेदन दिले. ते निवेदन घेऊन ते पंचायत समितीमध्ये जात असताना रवींद्र दिलीप मोरे (रा.पिंपरखेड ता. चाळीसगाव) याने त्यांच्या अंगावर येऊन माझ्याकडे ताठ का बघतो?, म्हणून माझ्याशी खेटू नको असे म्हणून हुज्जत घालून शिवीगाळ केली. तसेच तू आमच्या विरोधात बातम्या छापतो का?, तुझे हातपाय तोडतो. तुला मारून टाकेन, असे म्हटला.
तेव्हा त्याचा भाऊ ग्रामपंचायत उपसरपंच सिद्धार्थ मोरे याने अंगावर धावून येत, तुला जिवंत सोडणार नाही. तू पत्रकार असला तरी आम्ही पत्रकारांना घाबरत नाही. तुला ज्या बातम्या छापायाच्या त्या छाप, असे म्हणून झटापटी करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर, तू आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर आम्ही ग्रामपंचायतचे पदाधिकारीआहोत. आम्ही ग्रामपंचायतची कामे घेऊन ठेकेदारी करतो. त्या कामांबद्दल तू आमच्याकडे पैसे मागतो, असा खोटा खंडणीचा व दुसरा काहीपण खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली, असे निवेदनात म्हटले असून दोघे भाऊ आडदांड व खुनशी आहेत. कदम यांच्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास त्यास रवींद्र मोरे व सिद्धार्थ मोरे हे जबाबदार राहतील, असे म्हणत दोघांवर पत्रकार संरक्षण कायदा व क्रिमिनल लॉ अमेंटमेंट 1932 चे कलम 7 (1) (a) नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. असे न झाल्यास आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.