जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पोलीस कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने या सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
बीएचआर घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच ११ संशयिताना ताब्यात घेतले होते. त्यात अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे) यांचा समावेश होता. या सर्वाना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षाने आरोपींकडून अधिकची माहिती मिळवायची असल्यामुळे पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी केली. तर बचाव पक्षाने संशयितांची आधीच पाच/ सहा दिवस चौकशी झाली असल्यामुळे एमसीआर करावा, अशी मागणी करण्यात आली. यावर न्यायालयाने सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, अटकेतील कोणकोणते संशयितांकडून जामीन अर्ज टाकला जातो, हे उद्याच समजणार आहे.
















