मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एका महिलेने धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी (extortion) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलिसांकडे एका महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या क्राईम ब्रँचकडून करण्यात येत आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान एका परिचित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने आपल्याकडे पाच कोटी रुपयांचं दुकान आणि एक महागडं घड्याळ मागितल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराची तक्रार करण्याची तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी या महिलेने दिल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, महिलेने केलेल्या मागणीनंतर धनंजय मुंडे यांनी सदर महिलेला परिचिताकरवी कुरियरच्या माध्यमातून ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईल पाठवला होता. पण या महिलेने ५ कोटींसाठी तगादा लावला त्यामुळे अखेरीच धनंजय मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सदर महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.