मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सरकारने वीज बिल माफ करण्यासंदर्भात योग्य भूमिका घेतली नाही, तर जनहितार्थ भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार रक्षाताई खडसे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू आता, जेवढे बिल आले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर भाजप खासदार रक्षाताई खडसे आक्रमक झाल्या आहेत. खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या, ‘जेवढे बिल आलेले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बिल माफ करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकत नसले तरी, काही प्रमाणात का होईना ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी केली आहे.