धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी.आर.हायस्कूलच्या चार शिक्षकांनी वारकरी संस्थानातील तीस विद्यार्थ्यांना गणवेश शिऊन समाजाप्रती आपली संवेदना व्यक्त केली.
शाळेच्या जी.पी.चौधरी, मनोज परदेशी, नवनीत सपकाळे आणि आर.एम.ठाकरे या चार शिक्षकांनी धरणगाव येथील वारकरी संस्थेत वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी ठिकठिकाणाहून आलेल्या गरीब व होतकरू अशा तीस विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेशाचे कापड घेऊन ते शिऊन दिले आहे.या विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.मंचावर ज्येष्ठ पत्रकार बी.आर.महाजन, उपमुख्याध्यापक डॉ.सौ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ, एनसीसी अधिकारी डी.एस.पाटील यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक डॉ.सोनवणे यांनी शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या सहृदयतेचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत बोरसे यांनी केले, सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक बी.डी.शिरसाठ यांनी तर आभारप्रदर्शन जी.आर.सूर्यवंशी यांनी केले.यावेळी शाळेचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.