जळगाव (प्रतिनिधी) गुलाबराव वाघ हे मला विचारूनच शिवसेनेच्या मेळाव्याला गेल्याची प्रतिक्रिया नुकतीच गुलाबराव पाटील यांनी दिली होती. परंतु या वक्तव्याचे खंडन करत गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेच्या मेळाव्याला जाण्यासाठी मला कुणालाही विचारण्याची गरज नसल्याचे जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील असलेले गुलाबराव पाटील यांनी एका दैनिकाशी बोलताना म्हटले होते की, गुलाबराव वाघ माझ्या भावासारखे आहेत. त्यांनी कायमच मला सहकार्य केलेय. सोमवारच्या मेळाव्यातही जाण्याबाबत त्यांनी मला विचारले असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला होता.
परंतु या वृत्ताचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे. श्री. वाघ यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना सांगितले की, मी तीस पस्तीस वर्षांपासून पासून हाडाचा शिवसैनिक आहे. शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमाला किंबहुना मेळाव्यात जाण्यासाठी मला कुणालाही विचारण्याची गरज नाही. मी गुलाबराव पाटील यांना गुरुवारी फोन करून स्पष्ट शब्दात विनंती केली होती की, आपण एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांना विनंती करा आणि पुन्हा शिवसेनेत परत या. उद्धव ठाकरे साहेब मनात कोणताही राग धरणार नाही. त्यामुळे मी सोमवारी गुलाबराव पाटील यांना फोन केला ही गोष्ट साफ खोटी आहे.
मी धरणगावच्या मेळाव्यातही बोललो की…जे परत येतील त्यांचे मनापासून स्वागत. परंतु जे दूर जातील ते आमचे शत्रू…अगदी आजही हीच भूमिका माझी कायम आहे. एक शिवसैनिक म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दगा देणारा प्रत्येक व्यक्ती हा आमचा कायम शत्रू राहील. तसेच मी आजही कट्टर शिवसैनिक होतो. उद्याही राहील. याबाबत मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दात गुलाबराव वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.