साकळी ता.यावल (प्रतिनिधी) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी येथील गुरुपीठ प्रणित व्हर्चुअल श्रीमद् भागवत सप्ताहाचे साकळी येथील सेवेकरी जगन्नाथ त्रंबक नेवे व शोभा नेवे यांच्याकडे घरगुती पद्धतीने दि.२० ते दि.२६ सप्टेंबर असे सात दिवस आयोजन करण्यात करण्यात आले होते.
या सप्ताहादरम्यान तिसऱ्या दिवशी कृष्ण जन्मउत्सव, चौथ्या दिवशी गोवर्धन पर्वत तर पाचव्या दिवशी राधा-कृष्ण विवाह तसेच समाप्तीचा कार्यक्रम छोटेखानी स्वरूपात आयोजित केले होते. या सप्ताहाचा परिसरातील मोजक्याच महिलां, भाविकांनी लाभ घेतला. दि.२४ रोजी आयोजित केलेल्या विवाहप्रसंगी दोन लहान मुलांना राधा-कृष्णाच्या स्वरूपात आकर्षकपणे व लक्षवेधी अशा स्वरूपात वेशभूषा करण्यात आली होती. देवांचा विवाह सोहळा विधिवत पद्धतीप्रमाणे केला गेला.
याप्रसंगी परिसरात रांगोळ्या व इतर पद्धतीने सजावट करण्यात आलेली होती. याप्रसंगी सदर प्रभागाच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.निलिमा चंद्रकांत नेवे या उपस्थित होत्या. यावेळी कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेता सर्व भाविक भक्तांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. या सप्ताहादरम्यान सीमा चौधरी, ललिता पाटील, मंगला चौधरी, रत्ना चौधरी, वैशाली पाटील, वैशाली मराठे, कु.दिपाली महाजन यांच्यासह मयूर बोरसे, विकी माळी, अमोल माळी यांच्यासह याभागातील सर्व सेवेकर्यांनी सहकार्य केले.