मुंबई (वृत्तसंस्था) १४ लाख रुपयांत रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत मुंबईसह सातारा, लातूर भागातील १२ जणांची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे घोटाळ्याचे बींग भुसावळला फुटले. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चुनाभट्टी येथे राहणारे हरिश्चंद्र कदम यांनी वडिलांच्या निधानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. याचदरम्यान त्यांची शिवाजी घणगे या वकिलाशी ओळख झाली. पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी शिवाजीने कदम यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले. मात्र, काम न झाल्याने पैसे परत केले. त्यानंतर शिवाजीने कदम यांना रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने २०२१ मध्ये १४ लाखांची मागणी केली. कदम यांनी त्यासाठी शेतजमीन विकली, राहत्या घरावर काही कर्जही घेतले आणि स्वतःचे व भाच्याचे असे २८ लाख रुपये घणगेकडे सोपवले. यामध्ये एकूण १२ जणांची १ कोटी ५६ लाख रुपयांना फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
ऑर्डर कॉपी बनावट देत पाठवले भुसावळला !
रेल्वेची बनावट ऑर्डर देऊन, त्यावर बनावट सही आणि बनावट शिवच्यांचा वापर करून, ती ऑर्डर खरी असल्याचे भासवले. त्यानुसार, उमेदवारांनी सुरुवातीला भुसावळ ट्रेनिंग सेंटर गाठले. मात्र, तेथे गेल्यानंतर ऑर्डर कॉपी बनावट असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. याबाबत घणगेला संपर्क साधल्यानंतर त्याने तेथे धाव घेतली. उमेदवारांना बाहेर थांबवून तो आतमध्ये गेला. त्यानंतर, जवळच्या रुग्णालयात मेडिकल टेस्ट झाली. त्यानंतर काही दिवसांनी ऑर्डर चुकीची काढल्यामुळे नव्याने ऑर्डर काढणार असल्याचे सांगितले.
चेन्नईला खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग !
यानंतर १३ जणांची यादी देत त्यांना चेन्नईला पाठवले. तेथे एका खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये एक महिना ट्रेनिंग पूर्ण करण्यास भाग पाडल्याचे तरुणांनी आरोप केला आहे. दरम्यान, हरिश्चंद्र कदम यांनी शिवाजी घणगेला पैसे दिले होते. मात्र, पैसे परत करण्याचा तगादा लावताच घणगेने पैसे आरोपी चौकडीला दिल्याचे सांगितले, तसेच आपल्या मुलीचीही फसवणूक केल्याचे नमूद करत कदम यांनी ११ जून २०२२ रोजी तक्रार दिली.















