चाळीसगाव (प्रतिनिधी) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात RTO म्हणजे त्या त्या भागाची /इ परिसराची ओळख. आजच्या सोशल मिडीयाच्या युगात तर MH ०१ ते MH ५० अश्या नावाने हजारो पेजेस, अकौंटंस च्या माध्यमातून तरुण पिढी आपल्या भागाची ओळख घट्ट करताना दिसत आहेत. आज दि.७ मार्च २०२५ रोजी चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला १ वर्ष पूर्ण होत आहे. मिल्कसिटी, गणित नगरी अशी ओळख मिरविणाऱ्या चाळीसगावच्या मुकुटात MH५२ अशी नवी “बावन्न”कशी ओळख निर्माण झाली आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने चाळीसगाव येथे स्थापन झालेल्या या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत ५८८९ दुचाकी, ४६३ छोट्या चारचाकी, ५४८ शेती ट्रक्टर, १२० मोठी मालवाहतूक वाहने आदी एकूण ७३४४ वाहनांची नोंदणी करण्यात आली. तसेच नवीन ३०४६ वाहन चालवण्याचे नवीन परवाने, १४७२ जुन्या परवान्यांचे नूतनीकरण देखील करण्यात आले. यातून वर्षभरात चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला १६ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यासोबतच वाहनांच्या कामांसाठी जळगाव येथे १०० किमी अंतरावर वाहन धारकांची होणारी फिरफिर आता टळली असून चाळीसगाव येथेच सर्व काम होत असल्याने वाहनधारकांचा वेळ, श्रम, पैसा वाचत आहे.
कराडचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्यात २०११ मध्ये MH 50 कराड जि.सातारा हे कार्यान्वित असलेले शेवटचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु झाले होते. त्यानंतर फक्त नवीन जिल्हा स्थापन झाल्यावरच नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याचे धोरण शासनाने ठरवले. या काळात राज्यभरातून अनेक प्रस्ताव शासन दरबारी दाखल झाले मात्र धोरणात बसत नसल्याने ते धूळखात पडून होते. मात्र धोरणाचे हे चक्रव्यूह भेदण्याचे शिवधनुष्य चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उचलले व अवघ्या ३ महिन्यात चाळीसगाव येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी मंजूर करून आणला. एव्हड्यावरच ते थांबले नाहीत तर मंजुरीनंतर अवघ्या १५ दिवसात दि.७ मार्च २०२४ रोजी आपल्या MH५२ या नव्या ओळखीसह कार्यालय कार्यान्वित करण्याची रेकॉर्ड कामगिरी देखील त्यांनी करून दाखवली. एक चाळीसगावकर म्हणून हि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.