धरणगाव (प्रतिनिधी) कल्याणेहोळ बु. येथे हिंस्त्र प्राण्याने १० बकऱ्यांचा फडशा पाडल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. दरम्यान,वनविभागासह पोलिसांनी पंचनामा केला असून यात लक्ष्मण दीपा पाटील या शेतकऱ्याचे साधारण १ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या संदर्भात अधिक असे की, कल्याणेहोळ बु. येथे गावठाण जागेत शेतकरी लक्ष्मण दीपा पाटील यांचे पत्री शेड आहे. या शेडमध्ये त्यांच्या बकऱ्या बांधलेल्या असतात. आज पहाटे सहा वाजेसुमारास त्यांच्या लक्षात आले की, अज्ञात हिंस्त्र प्राण्याने १० बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक कल्याणेहोळ येथे पोहचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बकऱ्यांवर हा हल्ला बिबट्याचा नसून लांडगा, कोल्हा किंवा तडस या वन्य प्राण्याचा असू शकतो, असा अंदाज वर्तविला. दरम्यान, या घटनेमुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
















