मुंबई (वृत्तसंस्था) देशाची अर्थव्यवस्था आता भरभराटीला आली आहे. देशातील कोरोना रूग्णांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. मृत्यूचे प्रमाणही खाली आले आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, अर्थव्यवस्थाही सुधारली आहे. त्या म्हणाले की, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबरमध्ये जीएसटी सवलतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देशाची अर्थव्यवस्था आता सावरत आहे. केंद्र सरकारनं उचलेल्या पावलांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली. देशभरात विक्रमी जीएसटीचा परतावा झाला आहे. याव्यतिरिक्त गुतवणुकीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसत असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी वीजेचा वापर १२ टक्के आणि जीएसटीचा परतावा १० टक्क्यांनी वाढला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बँक क्रेडिटमध्ये वार्षिक आधारावर २३ ऑक्टोबरपर्यंत ५.१ टक्क्यांची सुधारणा झाली आहे. परकीय चलनाच्या साठ्यातही वाढ झाली ५६० अब्ज डॉलर्स इतकी झाली असून तेदेखील विक्रमी असून सर्व आकडेवारीवरून देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचं दिसून येत असल्याचं सीतारामन म्हणाल्या.
“आत्मनिर्भर भारत अंतर्गत एक देश एक रेशन कार्डाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. १ सप्टेंबर २०२० पासून २८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याची सुरूवात करण्यात आली आहे. प्रवासी मजुरांना ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांना रेशन मिळणार आहे. यात सध्या दीड कोटी ट्रान्झॅक्शन्स होत महिन्याला होत आहेत,” अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली. प्रवासी मजुरांसाठी पारदर्शकता येण्यासाठी आम्ही पोर्टलही तयार केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोट्यवधी शेतकऱ्यांना किसान क्रेटिड कार्डाचा लाभ
६८ कोटी जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आलं. रब्बीच्या हंगामासाठी २५ हजार कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त यापूर्वी किसान क्रेडिट कार्डाची घोषणा करण्यात आली होती. १ कोटी ८३ लाख जणांनी यासाठी अर्ज केले होते. आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना याचे लाभ देण्यात आले असल्याचंही सीतारामन म्हणाल्या.
२ लाख कोटींचे पॅकेज जाहीर
बुधवारीच सरकारने १० क्षेत्रातील उत्पादकांसाठी २ लाख कोटी रुपयांचे प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह्स (पीएलआय) जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पीएलआय योजनेची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये औषध, ऑटोमोबाईल आणि ऑटो कंम्पोनंन्ट्स, दूरसंचार, नेटवर्कींग प्रोडक्ट्स, अॅडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल बॅटरीज, कपडे उद्योग, फूड प्रोडक्ट्स, सोलर मॉड्यूल, व्हाईट गुड्स आणि स्पेशालिटी स्टील सेक्टरला फायदा होणार आहे. देशात सध्या करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी करोनाचं संकट अद्यापही टळलं नाही. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतरही रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. तर अन्य काही शहरांमध्येही करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.