जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने जळगाव शहरासाठी १०० कोटी रूपयांच्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे.
जळगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून महापालिका प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झालेले आहे. या पार्श्वभूमिवर, ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांसाठी भरीव निधी मिळाला होता. यानंतर आज पुन्हा एकदा १०० कोटी रूपयांचा निधी मिळालेला आहे.
या निधीतून जळगाव शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ना. गिरीशभाऊ महाजन यांनी केले आहे. जळगावातील विकासकामांना निधीची कोणतीही अडचण येऊ देणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. आमदार राजू मामा भोळे व शहरातील नगरसेवकांनी नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे रस्त्यांच्या कामाकरता निधी मागितला होता. गिरीशभाऊ यांनी जळगाव शहर वासियांची मागणी पूर्ण करत असताना आणखी शंभर कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली.