धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून धरणगाव शहराच्या सोशल मिडीयावर नगरपालिकेतील १३ कोटीच्या भ्रष्टाचारी जोरदार चर्चा सुरु असल्यामुळे राजकीय वातावरण तापलेले होते. नेमकं हे प्रकरण काय होते?, याची कुणालाही माहिती नव्हती. परंतू आज भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन व माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देत प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. राज्य शासनाचे आर्थिक विभागाचे अधिकृत लेखापरीक्षक अधिकारी यांनी सन २०१८-१९ या एका वर्षात पालिकेत १३ कोटी ६६ लाख २४ हजार ४७९ रुपये अंतिम अमान्य तर वसूलपत्र रक्म्म चक्क १६ कोटी ३९ लाख ३ हजार १८३ रुपये असल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे, असे दोघांनी कळविले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांनी धरणगाव नगरपालिकेतील १३ कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत एक पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती. तेव्हापासून गावात या पोस्टची जोरदार चर्चा होती. परंतू आज या विषयावरून अखेर पडता उठला आहे. माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी माहिती अधिकारात जळगाव लेखापरीक्षण विभागाकडून धरणगाव नगरपालिकेचा लेखापरीक्षण अहवालाची माहिती मागितली होती. परंतू त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तब्बल एक महिना फिरविल्यानंतर महाजन हे अपिलात गेले. अगदी स्वत: कायदेशीर मुद्द्यांवर युक्तिवाद केला. त्यानंतर त्यांना ही माहिती देण्यात आली. मला माहिती मिळू नये म्हणून मोठे राजकीय दबावतंत्र वापरण्यात आले. परंतू मोठ्या कष्टाने ही माहिती मिळविण्यात यशस्वी झालो. याबाबत आता लवकरच जिल्हाधिकारींकडे तक्रार करणार असल्याचे जितेंद्र महाजन यांनी सांगितले आहे.
याबाबत संजय महाजन यांनी म्हटले आहे की, काही दिवसापूर्वी सोशल मीडियात पोस्ट टाकल्यापासून यावर अभ्यास सुरु होता. ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. शरद माळी यांच्याकडून मुद्देसूत तक्रारी अर्ज तयार करण्याचे काम सुरु आहे. पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून हे सर्व संगनमताने झाले आहे. धरणगावकरांचा पैसा लाटून काही नगरसेवक गब्बर झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारींकडे रीतसर तक्रार करत गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत, असे महाजन यांनी कळविले आहे.
तर याबाबत अॅड. शरद माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, द बॉम्बे लोकल फंड अॅक्ट-१९३०चे कलम ३ (१), (ए,ए) नुसार तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून द बॉम्बे लोकल फंड ऑडीट रुल्स १९३१ चे सेक्शन ४ नुसार नियुक्त झालेल्या लेखापारीक्षकांनी ताशेरे ओढलेल्या आक्षेपाधीन वसूल पात्र रकमेसंदर्भात कारवाई करणे उचित झाले असते. सदर प्रकरणात दोघं संयुक्त तक्रारदार अॅड.संजय महाजन व जितेंद्र महाजन हे माझे पक्षकार असून लवकरच योग्य ती पुढील पावलं उचलणार असल्याचे सांगितले.
धरणगाव नगरपालिकेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून १३ कोटी अखर्चित निधी असून तो फक्त ऑडिटमध्ये निघालेला आहे. अखर्चित निधी वापरला नाही, म्हणून तो निघालेला दिसून येत आहे. बिल निघायचे बाकी आहेत. तो धिनी २०१७- १८ वर्षाचा आहे. ज्याला चौकशी करायची असेल त्यांनी येऊन ऑडिट रिपोर्ट घेऊन जावा. ती रिपोर्ट माझ्या कार्यकाळचा अगोदरचा आहे.