चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव मतदारसंघासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणारा क्षण असून, दावोस (स्वित्झर्लंड) येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म (WEF) 2026 दरम्यान महाराष्ट्र शासन व अमेरिका, सॅन फ्रान्सिस्को येथील ACTUAL HQ कंपनी यांच्यात चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५,००० कोटी रुपयांचा Sustainable Aviation Fuel (SAF) प्रकल्प उभारण्याचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण गुंतवणूक करार झाल्याने चाळीसगावच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
ऊस, मका, कापूस, बांबू तसेच शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरले जाणारे हरित इंधन तयार करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा महाप्रकल्प चाळीसगावमध्ये उभारला जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून मोठा उद्योग चाळीसगावमध्ये यावा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्रोत मिळावेत आणि तरुणांना स्थानिक रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. आज त्या प्रयत्नांना यश आले असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
ACTUAL HQ, Sankla Renewables आणि SCUBE Infra यांच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या या प्रकल्पातून ३,००० हून अधिक युवकांना थेट रोजगार मिळणार असून, शेतकरी, वाहतूक व सेवा क्षेत्रात हजारो अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. FPO मार्फत शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने कृषी अवशेष खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्थैर्य मिळणार आहे.
मुंबई–आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग तसेच रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे चाळीसगावची लॉजिस्टिक क्षमता या महाप्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल ठरली आहे. १०० टक्के नवीकरणीय ऊर्जेवर आधारित हा प्रकल्प पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे. चाळीसगावच्या औद्योगिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा हा १५ हजार कोटींचा SAF महाप्रकल्प असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व चाळीसगावकरांच्या आशीर्वादाने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याचा संकल्प आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
















