धरणगाव (प्रतिनिधी) एका धक्कादायक घटनेत, वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने थेट खून केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने वडिलांच्या हत्येप्रकरणी एकेकाळी संशयित ठरलेला, मात्र न्यायालयातून निर्दोष सुटलेला व्यक्ती याच्या डोक्यात गोळी घालून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्याने थेट धरणगाव पोलीस ठाणे गाठत स्वत:हून आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
मनात होती बदल्याची आग
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल सावंतचे वडील 2010 साली गावातील वादातून खामखेडे येथे झालेल्या भांडणात ठार मारले गेले होते. या प्रकरणात गोपाल मालचे याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेनंतर गोपाल मालचे याची निर्दोष मुक्तता झाली. कोर्टाने आरोपातून मुक्त केलं असलं, तरी राहुलच्या मनात त्या रात्रीची जखम कायम जिवंत होती – आणि काळाच्या गर्तेत बदल्याची तीव्र आग धगधगत होती.
थेट कपाळावर झाडली गोळी
मंगळवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास, गोपाल मालचे आपल्या कुटुंबीयांसह खामखेडे येथून वाकटूकीकडे कारने परतत होते. वाटेत सोनवद गावाजवळील विहीर फाटा परिसरात अचानक त्यांना अडवण्यात आलं – कारण रस्त्याच्या मधोमध एक बुलेट थांबवलेली होती. कार थांबताच गोपाल मालचे खाली उतरले… आणि तेवढ्यात राहुलने थेट गोपालच्या कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडली. आणि गोपाल मालचे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्यानंतर राहुल सावंतने घटनास्थळावरून पळ न काढता थेट धरणगाव पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी पोलिसांनी राहुलविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.