बीड (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातील मुळीकवस्ती परिसरात भरदिवसा जवळपास 150 ते 200 विद्युत मोटारीने तलावातील पाणी उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे गाव परिसरातील जवळपास 10 गावांवर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.
पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका परिसरात मुळीकवस्ती आहे. या मुळीकवस्ती लगतचं तलाव (लघु प्रकल्प) आहे. या तलावावर गाव परिसरातील नागरिकांनी जवळपास 150 ते 200 विद्युत मोटारी बसवले आहेत. विशेष म्हणजे या सर्व मोटारी जवळजवळ असून मोटारीच्या पाईपच्या देखील रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व मोटारी आकडा टाकून म्हणजेच वीजचोरी करून सुरू असून याकडे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान भरदिवसा एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजचोरी आणि पाणी चोरी होत असताना, प्रशासन डोळेझाकपणा करत असल्याने, या मुळीकवस्ती गाव परिसरातील जवळपास 10 गावांवर पाणी संकट घोंगावत आहे. त्याचबरोबर वीज चोरीमुळे देखील लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे.
















