रावेर (प्रतिनिधी) उधारीवर केळी मालाची खरेदी केल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्या राजस्थानसह उत्तर प्रदेशातील व्यापार्याविरोधात रावेर पोलिसात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या माध्यमातून रावेरातील केला एजन्सी सप्लायर्सची तब्बल 25 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी आता राजस्थान व युपीतील व्यापार्याचा शोध सुरू केला असून अशाच पद्धत्तीने आणखी काही केळी उत्पादकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
सुरेशकुमार गमनोमल रत्नानी (66, छोरीया मार्केट, रावेर) हे केळी माल सप्लायर्स असून त्यांची रावेरात प्रकाश केला एजन्सी आहे. रत्नानी यांच्या तक्रारीनुसार, संशयित श्यामसुंदर शर्मा (कैथरी फू्रट प्रा.लि.ढोलपूर, राजस्थान) यांना सन 2014 ते 2017 दरम्यान वेळोवेळी केळी माल उधार देण्यात आला मात्र त्यांनी तब्बल 12 लाख 28 हजार 316 रुपये थकवून शेतकर्याची फसवणूक केली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर रत्नानी यांनी तक्रार दाखल केली. तपास उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.
एजन्सी चालकाची दुसर्यांदा फसवणूक
प्रकाश केला एजन्सीचे सप्लायर्स सुरेशकुमार गमनोमल रत्नानी (66, छोरीया मार्केट, रावेर) यांच्या तक्रारीनुसार, सन 2014 ते ऑक्टोबर 2018 दरम्यान संशयित अनिलकुमार प्रमोदकुमार शर्मा (ओमश्री फ्रूट कंपनी, डुंगरवाला, ता.खेरागढ, जि.आग्रा, उत्तरप्रदेश) यांनी 13 लाख नऊ हजार 875 रुपयांची केळी खरेदी केली व दिड ते दोन महिन्यात केळीचे पेमेंट पाठवण्याचे आश्वासन रत्नानी यांना दिले मात्र मुदत संपूनही संबंधित पेमेंट पाठवत नसल्याने तसेच फोनला रीप्लाय देत नसल्याचे फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर रत्नानी यांनी पोलिसात धाव घेतली. तपास फौजदार नवले करीत आहेत.